मृत बिबट्या आढळल्याने खुलताबादमध्ये खळबळ

Foto

खुलताबाद - तालुक्यातील गल्लेबोरगाव जवळील पिंपरी  शिवारात सोमवारी (ता. १९) सकाळी मृत बिबट्या आढळला. बिबट्या आढळल्याची बातमी पंचक्रोशित पसरली आणि मृत बिबट्याला पाहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

 

पिंपरी शिवारातील शेतकरी अंकुश राजाराम अधाने यांच्या शेतात मक्याच्या पिकात मृत बिबट्या आढळला. अधाने हे रोजच्या प्रमाणे त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले तेव्हा मक्याच्या शेतात त्यांना मृत बिबट्या आढळला. त्यांनी लगेच चिंचोली येथील उपसरपंच रामहरी बोडखे, संजय राजपूत व साईनाथ बोडखे यांना त्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच खुलताबाद वनविभागालाही या घटनेची माहिती कळवण्या आली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल असे त्यांनी सांगितले.

 

पिंपरी शिवारात मृत बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी येथे मोठी गर्दी केली आहे.